बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    जिल्हा परिषद अधिनियमाच्या अनुसूची एकमध्ये परिषदेकडील कामांची यादी दिली आहे. त्यात 123 कामांची नोंद आहे. स्थूलमानाने असे म्हणता येईल की शिक्षण, आरोग्य, दळणवळण या सेवा पुरविणे आणि कृषी, ग्रामीण उद्योग यांच्या विकासाचे कार्यक्रम हाती घेणे, ही परिषदेची महत्वाची कामे होत. शिक्षण व दळणवळण यांच्या कार्यक्रमांचा विस्तार हा शेती व उद्योगधंदे यांच्या विकासाला पोषक होईल, अशा रीतीने करावा व जलसिंचन, सहकार या कार्यक्रमांवर भर द्यावा अशी अपेक्षा आहे. अनुसूचित जाती व जमातींच्या उन्नतीकडे लक्ष देणे हीदेखील जिल्हा परिषदेची विशेष जबाबदारी मानण्यात आली आहे.

    वर उल्लेखिलेली कामे ही राज्य सरकारच्याही कक्षेतील आहेत. म्हणून राज्य सरकार आणि जिल्हा परिषदा यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली असून तीत आवश्यकतेनुसार फेरबदल होत असतो. उदा. प्राथमिक शिक्षण हे पूर्णतः परिषदेकडे सोपविण्यात आले आहे. शाळांच्या इमारतींची बांधणी, शिक्षकांच्या कामावर देखरेख इ. कामे परिषद करते. नगरपालिका असलेल्या परंतु स्कूल बोर्डे नसलेल्या शहरांतील प्राथमिक शाळांचे संचालनही परिषदांकडे सोपविलेले आहे. माध्यमिक शाळांची तपासणी व अनुदानाच्या रकमा पाठवणे, ही कामे परिषदेचा शिक्षणाधिकारी करीत असला, तरी जिल्हा परिषदेला त्यात दखल देता येत नाही.

    दळणवळणाबाबत राष्ट्रीय व राज्य हमरस्त्यांची बांधणी व देखरेख राज्य सरकारकडे आहे तर जिल्ह्यातील रस्ते, छोटे पोचमार्ग वगैरेंची बांधणी व देखरेख परिषदेकडे आहे. जलसिंचन योजनेत सु. शंभर हेक्टरपर्यंत जमिनीला पाणीपुरवठा होईल, असे प्रकल्प परिषदेला घेता येतात, तर त्यापेक्षा मोठे असलेले प्रकल्प राज्य सरकारच्या कक्षेत येतात.